नमस्कार मित्रांनो दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळीसाठी नातेवाईकांकडे जाण्यासाठी किंवा महिलांची माहेरी जाण्याची लगबग असते. गावा खेड्यात प्रवासाचे सुरक्षित साधन म्हणजे एसटीच आहे.
मात्र, आता ऐन दिवाळीत एसटीचा प्रवास महागणार असल्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक महिन्याच्या कालावधीकरिता प्रवास भाड्यात 10 टक्के वाढ केली आहे. शिवनेरी वगळता इतर सर्व प्रकारच्या बसेसकरिता 25 ऑक्टोबरपासून दरवाढ लागू होणार आहे.एसटी महमंडळाने साधी, निमआराम, शयन, आसनी, शयनयान वातानुकूलित, शिवाई, शिवशाही (आसनी) आणि जनशिवनेरी बससेवेसाठी भाडे वाढवले आहे. एक महिन्यासाठी ही भाडेवाढ कायम राहणार आहे.
त्यानंतर हंगाम संपल्यानंतर 26 नोव्हेंबरपासून भाडे पूर्ववत होणार आहे. सध्या मिळालेल्या माहितीनुसार, सहा किमीचा एक टप्पा असतो. त्यानुसार साध्या बसचे भाडे ८.७० रुपये आहे. त्यात दहा टक्के वाढ झाली असल्याने ९.५५ रुपये म्हणजे एकूण दहा रुपये एका टप्प्यासाठी प्रवाशांना मोजावे लागणार आहेत.